मंगळवार, २८ मार्च, २०२३

पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांची मुलाखत


‘महापशुधन एक्स्पो’ मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत 
कुक्कुट व विषाणू लसींच्या उत्पादनामध्ये पूर्वीच्या तुलनेत ५ पटीने वाढ होणार

        शिर्डी येथे २४ ते २६ मार्च २०२३ या कालावधीत देशपातळीवरील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ या प्रदर्शनाचे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या ‘महापशुधन एक्स्पो’त सर्वसामान्य शेतकरी ,पशुपालक, नागरिक,‌ विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परराज्यातून येणाऱ्या पशुधनाची उत्तम काळजी व स्थानिक पातळीवरील उत्कृष्ट नियोजन यामुळे हे प्रदर्शन यशस्वी झाले. या निमित्ताने या प्रदर्शनाची यशस्विता व पशुसंवर्धन विभागाची सद्यस्थिती याविषयी पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह यांच्याशी साधलेला संवाद...


        ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ च्या उत्कृष्ट यशस्वी आयोजनाविषयी श्री.प्रताप सिंह म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन यामुळे ‘महापशुधन एक्स्पो’ चे उत्कृष्ट आयोजन करणे शक्य झाले. नियोजनासाठी स्थानिक पातळीवर खासदार डॉ.सुजय विखे-पाटील हे स्वत: माझ्यासोबत तीन दिवस प्रदर्शनात तळ ठोकुन होते. यामुळे नियोजन करणे सहज शक्य झाले. राज्याचे सर्व पशुसंवर्धन अधिकारी, कर्मचारी यांनी ही समर्पण भावनेने काम केले. सांघिक भावनेने केलेल्या कामामुळे प्रदर्शनाची यशस्विता शक्य झाली.
        शेती महामंडळाच्या ४६ एकर जागेवर भरविण्यात आलेल्या या ‘एक्स्पो’त देशातील १२ राज्यातून विविध 89 प्रजातीचे १३०० पशुधन एकाच छताखाली पहाण्यास मिळाले, पशुसंवर्धनविषयक विविध विषयांवर प्रात्यक्षिके, चर्चासत्रे घेण्यात आली व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती देणारे ३४ जिल्ह्याचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. नव-नविन तंत्रज्ञानाचा माहितीचे ३०० पेक्षा अधिक स्टॉल्स होते. महिला बचत गटाचे विविध उपक्रम व त्यांच्या सादरीकरणासाठी स्वतंत्र स्टॉल्स होते. ग्रामीण विकासाशी संलग्न शासनाच्या विविध विभागांचा या प्रदर्शनात सहभाग होता. डॉग व कॅट शो चे आयोजन करण्यात आले होते.


        अहमदनगर जिल्हा हा सहकारी संस्थांचे जाळे असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात दुग्धव्यवसायाची व्याप्ती मोठी असली तरी पशुसंवर्धनविषयक इतर व्यवसाय जसे की कुक्कुटपालन, शेळी व मेंढीपालन तसेच वराहपालन, सहकारी पशुखाद्य निर्मिती केंद्रे यासारख्या विविध व्यवसाय व उपक्रमांची व्यापकता वाढविणे शक्य आहे. सरासरी दररोज राज्यातील सुमारे एक ते दीड लाख पशुपालक - शेतकरी बांधवांनी या ‘एक्स्पोस’ भेट दिली आहे. प्रदर्शनातील विविध विषयांच्या स्टॉल्सला भेटी देऊन पशुसंवर्धनाचे महत्त्व व शास्त्रोक्त पशुसंगोपन पद्धती, चारा व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन व नवनवीन संशोधन पद्धती समजावून घेतले आहेत. यामुळे आगामी काळात संपूर्ण राज्यात पशुसंवर्धन व्यवसायाची व्याप्ती वाढणार आहे. एकंदरीत हे प्रदर्शन महाराष्ट्राच्या प्रगत व विकसित पशुसंवर्धनाची नांदी ठरणार आहे. ‘महापशुधन एक्स्पो’ मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास ही पशुसंवर्धन आयुक्तांनी व्यक्त केला.


        पशुसंवर्धनाच्या व्यवसायांची सद्यस्थिती व पशुजन्य उत्पादने याबाबत माहिती देतांना श्री.प्रतापसिंह यांनी सांगितले की, राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर आणि एकूणच राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने पशुजन्य उत्पादने दूध, अंडी व मांस यांचे महत्त्व वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार प्रती व्यक्ती प्रति दिन २८३ ग्रॅम दूध, वार्षिक १८० अंडी आणि वार्षिक ११ किलो मांसाची गरज आहे. एकूणच उपलब्धता आणि गरज याचा विचार करून ग्रामीण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची गरज आहे. त्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन दूग्धव्यवसाय, शेळी - मेंढीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय व त्याला पूरक अशा विविध योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून निर्णायक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
        लम्पी संकटांवर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांविषयी श्री.प्रतापसिंह म्हणाले, राज्यात लम्पी चर्म रोगाची साथ प्रथम जळगाव जिल्ह्यात आढळून आली. यानंतर सम्पूर्ण राज्यात या रोगाचा प्रसार वाढला. यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सर्व गोवर्गीय पशुधनास मोफत लसीकरण करण्याची कार्यवाही पशुसंवर्धन विभागाने मोहीम स्वरूपात राबविली. तसेच पशुधनाचे उपचार व मृत पशुधनाची शास्त्रीय विल्हेवाट लावल्याने इतर राज्यांच्या तुलनेत पशुधनाचा मृत्युदर आपण अत्यल्प राखू शकलो.
        राज्यातील पशुरोग निदानासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत राज्यात ७ ठिकाणी विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळामध्ये आरटी पीसीआर (RT-PCR) ही नवीन आधुनिक चाचणी सुरु करण्यात आली आहे. तसेच रोग अन्वेषण विभाग, पुणे अंतर्गत अत्याधुनिक बीएसएल - २ व बीएसएल -३ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात जनावरांच्या रोगाचे निदान करणे हे अचूक व कमी वेळेत होण्यास मदत मिळणार आहे. लस उत्पादनासाठी पशुजैवपदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथे राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत GMP चा अवलंब करून अत्याधुनिक प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यानंतर कुक्कुट व विषाणू लसींच्या उत्पादनामध्ये पूर्वीच्या तुलनेत ५ पटीने वाढ होणार असून यामध्ये महाराष्ट्र राज्याची गरज भागवून उर्वरित लस ही इतर राज्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करणे शक्य होईल. असा विश्वास ही पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह यांनी व्यक्त केला.

                                                 मुलाखत - उप माहिती कार्यालय, शिर्डी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया !

एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया ! संत गाडगेबाबांच्या शिकवणीचा अंगीकार हातात खराटे, फावडी, घमेली घेत एक अवलिया गावांमध्ये अवतर...