२००० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
शिर्डी, दि. १९ मार्च (उमाका वृत्तसेवा) : - राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज राहाता तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जात अवकाळी पाऊस व गारपीटने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. महसूलमंत्र्यांनी यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.राहाता तालुक्यातील ममदापूर, राजुरी या गावातील द्राक्षे, डाळिंब, गहू , कांदा या शेती पिकांची त्यांनी पाहणी केली. या दौऱ्यात शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, मंडलाधिकारी ठाकरे, तलाठी राहुल मंडलिक तसेच या गावातील सरपंच, पोलीस पाटील, पदाधिकारी व शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील सुमारे १०२७ शेतकऱ्यांच्या २००० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी व गारपीटग्रस्त झालेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, पंचनामे प्रत्यक्ष शेतात जाऊन सविस्तर, अचूक करा. शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेऊन प्रत्येक नुकसानीची तपशीलवार नोंद घ्यावी. घरांची पडझड, पशुधनाची हानी, इतर जिवीत हानी आदी पंचनाम्याची तसेच तात्काळ मदतीची प्रक्रिया पूर्ण करावी. असे निर्देश ही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिले.
संकटाच्या काळात शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका सरकारने घेतली असून, पुर्वीप्रमाणेच शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची भूमिका सरकारची राहिल. शेतक-यांनी घेतलेल्या शेती पिकांच्या कर्जाबाबतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरच निर्णय करु अशी ग्वाही ही महसूलमंत्र्यांनी यावेळी शेतक-यांना दिली. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील राजु नामदेव मोरे यांचा वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबीयांना तातडीची मदत म्हणून ४ लाख रुपये देण्याच्या सुचना आधिका-यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पीकविम्याच्या बाबतीत यापूर्वी कंपन्यांकडून शेतक-यांची फसवणूक झाली. ही परिस्थिती बदलविण्यासाठीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतक-यांना आता १ रुपयात विमा देण्याची भूमिका घेतली असून, शेतक-यांना याची कोणतीही आर्थिक झळ बसणार नाही. यासाठी सरकारने सर्व आर्थिक तरतुद केल्याचेही महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.
नुकसानीचे निेकष पाहून मदतीबाबत निर्णय होतीलच परंतू यापेक्षाही शेतक-यांनी शेती पिकासाठी जिल्हा सहकारी बॅंक तसेच राष्ट्रीयकृत बॅंकाकडून घेतलेल्या कर्जाचे मोठे प्रश्न आता निर्माण होणार आहेत. याबाबतही शेतक-यांना दिलासा देणारी भूमिका सरकारला घ्यावी लागेल यासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
by - उप माहिती कार्यालय, शिर्डी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा