शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

राहाता मधील निराधारांना ३ कोटी ८८ लाखांचे वितरण !

मार्च अखेर एकही लाभार्थी मदतीपासून वंचित नाही

पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जलद कार्यवाही



शिर्डी, दि.३१ मार्च (उमाका वृत्तसेवा) – राज्याचे महसूलमंत्री तथा ‍जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुका प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करत विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना ३ कोटी ८८ लाख ८० हजार रूपयांच्या अनुदानाचे वितरण केले आहे. गेल्या काही महिन्यापासून लाभापासून वंचित असलेल्या ११६०७ लाभार्थ्यांना मार्च २०२३ अखेरपर्यंतचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. आता एकही लाभार्थी अनुदानाच्या लाभापासून वंचित नाही. अशी माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या वतीने वंचित घटकांसाठी विशेष सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असते. या विशेष सहाय्य योजनांच्या माध्यमातून राहाता तालुक्यातील १२१३२ लाभार्थ्यांना दर महिन्याला १ कोटी २१ लाख ७२ हजार रूपयांची मदत दिली जाते. यापैकी ११६०७ लाभार्थ्यांना मागील तीन महिन्यापासून अनुदान अभावी लाभ वितरित करण्यात आला नव्हता. अनुदान प्राप्त झाल्यानंतर सदर लाभार्थ्यांना तत्परतेने विशेष सहाय्याचे मानधन वितरित करण्यात आले आहे.


राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन आदी योजना समाजातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येत असते. या योजनांमध्ये लाभार्थ्यांना कमीत कमी ६०० ते १००० रूपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येत असते.

संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतंर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१,००० पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेत लाभापासून वंचित ४४०१ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १ कोटी ३९ लाख ७९ हजार १०० रूपयांचे अनुदान मार्चअखेर वितरित करण्यात आले आहे.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत 65 वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीना निवृत्ती वेतन देण्यात येत असते. या योजनेत लाभापासून वंचित ४३५६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १ कोटी ९३ लाख ७९ हजार २०० रूपयांचे अनुदान मार्चअखेर वितरित करण्यात आले आहे.


इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत दारिद्रय रेषेखालील ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती या योजनेत पात्र ठरतात. या योजनेत लाभापासून वंचित २६६३ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ४५ लाख ७० हजार ९०० रूपयांचे अनुदान मार्चअखेर वितरित करण्यात आले आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या ४० ते ६५ वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून प्रतीमहा रु.200 व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत प्रतीमहा रु.400 असे एकूण प्रतीमहा 600 निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे. या योजनेत लाभापासून वंचित १५७ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २ लाख ५० हजार ८०० रूपयांचे अनुदान मार्चअखेर वितरित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत लाभापासून वंचित ३० लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ६ लाख रूपयांचे अनुदान मार्चअखेर वितरित करण्यात आले आहे. अनुदान लाभ वितरणासाठी नायब तहसीलदार भारती घोरपडे व संगणक चालक अमोल फोफसे यांनी मेहनत घेतली. अशी माहिती ही श्री.हिरे यानी दिली.

00000

बुधवार, २९ मार्च, २०२३

कृषी - यशोगाथा

एकरी १० लाखांचे उत्पन्न घेतायेतं तरूण शेतकरी !

गटशेतीमुळे तरूणांच्या जीवनमानात कायापालट



‘एकमेका सहाय्य करू, अवद्ये धरू सुपंथ’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय शासनाच्या गटशेती योजनेच्या माध्यमातून दिसून येतो. शासनाच्या गटशेती योजनेत अकोले तालुक्यातील विरगाव येथील तरूण शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी गट व शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. आज या कंपनीच्या माध्यमातून हे तरूण शेतकरी १०८ एकर शेतीचे उत्कृष्ट व्यवस्थापन करत आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल ३ कोटी रूपयांची असून पूर्वी जेमतेम एकरी १ लाख रूपये उत्पन्न घेणारे तरूण आता गटशेतीच्या माध्यमातून एकरी १० लाख रूपयांचे उत्पन्न घेत आहेत. गटशेतीच्या या अभिनव प्रयोगाने या तरूण शेतकऱ्यांच्या जीवनमानात कायापालट झाला आहे.


शेतकऱ्यांचे पीक उत्पादन वाढविण्यासाठी निविष्ठा, प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, काढणी पश्चात तंत्रज्ञान, कृषीमाल प्रक्रिया व पणन इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. यासर्व गोष्टींसाठी अनुदान व मदत महाराष्ट्र शासनाच्या गटशेतीस प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून दिले जाते. ही गोष्ट हेरून वीरगाव येथील तरूण शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले आणि २०१५ मध्ये कृषी संजीवनी डाळिंब व भाजीपाला उत्पादक गटाची स्थापना केली. प्रत्यक्षात २०१९ मध्ये हा गट कार्यरत झाला. गटशेती अंतर्गत खते व औषधे एकत्रित खरेदी केल्यानंतर सवलत मिळत होती. यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत व्हायची. या गटाच्या कामाला व्यापक स्वरूप देण्यासाठी २०२० मध्ये कृषी जननी फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली. आज या कंपनीच्या माध्यमातून यशस्वी व आदर्श शेती व्यवसाय करत आहे.


घरगुती आणि हॉटेल व्यवसायात ढोबळी मिरचीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यातून शेतकऱ्यांना वर्षभर पीक घेऊन शाश्वत उत्पन्न मिळेल. या हेतूने ढोबळी मिरची, काकडी व झेंडू पिकाची वीस सदस्यांच्या १०८ एकर क्षेत्रापैकी साडेअठ्ठावीस एकरवर शेडनेटमध्ये लागवड करतात. शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीचा हिरवा व रंगीत मिरचीचा यशस्वी प्रयोग या गटाने केला आहे. संपूर्ण शेतीसाठी ठिबक सिंचन केलेले आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतंत्र विहीर व शेततळे आहे. पिकाची वेळोवेळी देखरेख करुन आणि कृषी सल्लागाराला थेट बांधावर आमंत्रित करुन सल्ला घेतात. यदा कदाचित एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची लक्षणे दिसू लागली तर तत्काळ प्रतिबंधात्मक उपाय करतात.


ढोबळी (सिमला) मिरची व काकडीचे प्रतिदिन दोन टनापर्यंत उत्पादन घेतात. या शेतमालाची प्रसिद्ध व्यापाऱ्यांना बोलावून कंपनीद्वारे जागेवरच विक्री करतात. रोख पैसे घेऊन कंपनी यासह इतर रक्कम पंधरा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करतात. उत्पादित माल गटाने स्वतः बांधलेल्या भव्य पॅकिंग हाऊसमध्ये संकलित करतात.


या शेतकरी गटामध्ये तरुण शेतकरी गणेश तोरकड, जालिंदर खुळे, संतोष वर्पे, भानुदास बोडखे, संतोष अस्वले, विनायक शेळके, अनिल पानसरे, सतीष सहाणे, नारायण सोनवणे, अनिल देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, भास्कर सहाणे, शरद तोरकड, संदीप तोरकड, उमेश तोरकड, संजय खुळे व रवींद्र खुळे असे एकूण वीस सदस्य आहेत. गणेश तोरकड हे गटाची अध्यक्षपदाची तर जालिंदर खुळे हे सचिवपदाची धुरा सांभाळत आहेत. कंपनीच्या माध्यमातून गटशेती करणाऱ्या सर्वच्या सर्व वीस सदस्यांची आर्थिक उन्नती होत आहे.


दिवसेंदिवस प्रगतीचा आलेख उंचच ठेवण्यासाठी गटातील सदस्यांनी गोठा निर्मितीचा निर्णय घेतला आहे. सध्या हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. देशी गायींचे पालन करुन शेण, गोमूत्र, दूध यांपासून उत्पादनांची निर्मिती करुन विक्री करणार आहेत. गटातील सतीष सहाणे हे सॉफ्टवेअर डेव्हलपरची नोकरी सोडून उत्तम शेती करत आहे.


गटाची दर महिन्याच्या पाच तारखेला बैठक होते. तत्पूर्वी व्हाटसॲप गु्रपवर चर्चा करतात. यावरच अनेक विषयांचा उहापोह करतात. त्यानंतर बैठकीत त्यास मूर्त रुप देतात. दर पंधरा दिवसांनी प्रत्येक सदस्याच्या शेताला भेट देऊन पाहणी करतात. या गटशेतीसाठी शासनाकडून ६० टक्के अनुदान मिळते. यातील ७५ टक्के सामूहिक व २५ टक्के वैयक्तिक लाभासाठी मिळते. या आदर्श गटाला आत्तापर्यंत १० कोटी ८० लाखांच्या आसपास खर्च झाला आहे. यातील ४ कोटी अनुदान मिळाले आहे.

संगमनेर उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, अकोल्याचे तत्कालिन कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले असल्याचे हे तरूण सांगतात.

‘‘या शेतकरी गटाला कृषी विभागाचे पाठबळ मिळाले आहे. गटाने दर्जेदार भाजीपाला उत्पादनातून जिल्ह्यासह अन्य भागातंही नावलौकिक मिळवला आहे. एकत्र आल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे कृषी मालाचा दर ठरविण्याची या गटाला साधता आली.’’ अशी प्रतिक्रिया संगमनेर उपविभागीय कृषी अधिकारी सुधारक बोराळे यांनी दिली आहे.

लेखन - उप माहिती कार्यालय, शिर्डी.

मंगळवार, २८ मार्च, २०२३

पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांची मुलाखत


‘महापशुधन एक्स्पो’ मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत 
कुक्कुट व विषाणू लसींच्या उत्पादनामध्ये पूर्वीच्या तुलनेत ५ पटीने वाढ होणार

        शिर्डी येथे २४ ते २६ मार्च २०२३ या कालावधीत देशपातळीवरील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ या प्रदर्शनाचे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या ‘महापशुधन एक्स्पो’त सर्वसामान्य शेतकरी ,पशुपालक, नागरिक,‌ विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परराज्यातून येणाऱ्या पशुधनाची उत्तम काळजी व स्थानिक पातळीवरील उत्कृष्ट नियोजन यामुळे हे प्रदर्शन यशस्वी झाले. या निमित्ताने या प्रदर्शनाची यशस्विता व पशुसंवर्धन विभागाची सद्यस्थिती याविषयी पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह यांच्याशी साधलेला संवाद...


        ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ च्या उत्कृष्ट यशस्वी आयोजनाविषयी श्री.प्रताप सिंह म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन यामुळे ‘महापशुधन एक्स्पो’ चे उत्कृष्ट आयोजन करणे शक्य झाले. नियोजनासाठी स्थानिक पातळीवर खासदार डॉ.सुजय विखे-पाटील हे स्वत: माझ्यासोबत तीन दिवस प्रदर्शनात तळ ठोकुन होते. यामुळे नियोजन करणे सहज शक्य झाले. राज्याचे सर्व पशुसंवर्धन अधिकारी, कर्मचारी यांनी ही समर्पण भावनेने काम केले. सांघिक भावनेने केलेल्या कामामुळे प्रदर्शनाची यशस्विता शक्य झाली.
        शेती महामंडळाच्या ४६ एकर जागेवर भरविण्यात आलेल्या या ‘एक्स्पो’त देशातील १२ राज्यातून विविध 89 प्रजातीचे १३०० पशुधन एकाच छताखाली पहाण्यास मिळाले, पशुसंवर्धनविषयक विविध विषयांवर प्रात्यक्षिके, चर्चासत्रे घेण्यात आली व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती देणारे ३४ जिल्ह्याचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. नव-नविन तंत्रज्ञानाचा माहितीचे ३०० पेक्षा अधिक स्टॉल्स होते. महिला बचत गटाचे विविध उपक्रम व त्यांच्या सादरीकरणासाठी स्वतंत्र स्टॉल्स होते. ग्रामीण विकासाशी संलग्न शासनाच्या विविध विभागांचा या प्रदर्शनात सहभाग होता. डॉग व कॅट शो चे आयोजन करण्यात आले होते.


        अहमदनगर जिल्हा हा सहकारी संस्थांचे जाळे असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात दुग्धव्यवसायाची व्याप्ती मोठी असली तरी पशुसंवर्धनविषयक इतर व्यवसाय जसे की कुक्कुटपालन, शेळी व मेंढीपालन तसेच वराहपालन, सहकारी पशुखाद्य निर्मिती केंद्रे यासारख्या विविध व्यवसाय व उपक्रमांची व्यापकता वाढविणे शक्य आहे. सरासरी दररोज राज्यातील सुमारे एक ते दीड लाख पशुपालक - शेतकरी बांधवांनी या ‘एक्स्पोस’ भेट दिली आहे. प्रदर्शनातील विविध विषयांच्या स्टॉल्सला भेटी देऊन पशुसंवर्धनाचे महत्त्व व शास्त्रोक्त पशुसंगोपन पद्धती, चारा व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन व नवनवीन संशोधन पद्धती समजावून घेतले आहेत. यामुळे आगामी काळात संपूर्ण राज्यात पशुसंवर्धन व्यवसायाची व्याप्ती वाढणार आहे. एकंदरीत हे प्रदर्शन महाराष्ट्राच्या प्रगत व विकसित पशुसंवर्धनाची नांदी ठरणार आहे. ‘महापशुधन एक्स्पो’ मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास ही पशुसंवर्धन आयुक्तांनी व्यक्त केला.


        पशुसंवर्धनाच्या व्यवसायांची सद्यस्थिती व पशुजन्य उत्पादने याबाबत माहिती देतांना श्री.प्रतापसिंह यांनी सांगितले की, राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर आणि एकूणच राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने पशुजन्य उत्पादने दूध, अंडी व मांस यांचे महत्त्व वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार प्रती व्यक्ती प्रति दिन २८३ ग्रॅम दूध, वार्षिक १८० अंडी आणि वार्षिक ११ किलो मांसाची गरज आहे. एकूणच उपलब्धता आणि गरज याचा विचार करून ग्रामीण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची गरज आहे. त्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन दूग्धव्यवसाय, शेळी - मेंढीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय व त्याला पूरक अशा विविध योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून निर्णायक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
        लम्पी संकटांवर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांविषयी श्री.प्रतापसिंह म्हणाले, राज्यात लम्पी चर्म रोगाची साथ प्रथम जळगाव जिल्ह्यात आढळून आली. यानंतर सम्पूर्ण राज्यात या रोगाचा प्रसार वाढला. यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सर्व गोवर्गीय पशुधनास मोफत लसीकरण करण्याची कार्यवाही पशुसंवर्धन विभागाने मोहीम स्वरूपात राबविली. तसेच पशुधनाचे उपचार व मृत पशुधनाची शास्त्रीय विल्हेवाट लावल्याने इतर राज्यांच्या तुलनेत पशुधनाचा मृत्युदर आपण अत्यल्प राखू शकलो.
        राज्यातील पशुरोग निदानासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत राज्यात ७ ठिकाणी विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळामध्ये आरटी पीसीआर (RT-PCR) ही नवीन आधुनिक चाचणी सुरु करण्यात आली आहे. तसेच रोग अन्वेषण विभाग, पुणे अंतर्गत अत्याधुनिक बीएसएल - २ व बीएसएल -३ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात जनावरांच्या रोगाचे निदान करणे हे अचूक व कमी वेळेत होण्यास मदत मिळणार आहे. लस उत्पादनासाठी पशुजैवपदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथे राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत GMP चा अवलंब करून अत्याधुनिक प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यानंतर कुक्कुट व विषाणू लसींच्या उत्पादनामध्ये पूर्वीच्या तुलनेत ५ पटीने वाढ होणार असून यामध्ये महाराष्ट्र राज्याची गरज भागवून उर्वरित लस ही इतर राज्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करणे शक्य होईल. असा विश्वास ही पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह यांनी व्यक्त केला.

                                                 मुलाखत - उप माहिती कार्यालय, शिर्डी

सोमवार, २७ मार्च, २०२३

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल अनुदान

सन २०२२ - २०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना

रुपये ३५० प्रति क्विंटल अनुदान देण्याचा शासननिर्णय जाहीर ! 

अटी व शर्ती पहा ! 







रविवार, २६ मार्च, २०२३

‘महापशुधन एक्सपो २०२३’ चा समारोप व बक्षिस वितरण



शिर्डीत 'थीम पार्क' उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही


'महापशुधन एक्स्पो'ला तीन दिवसांत ८ लाख लोकांनी दिली भेट



शिर्डी, दि.२६ मार्च, २०२३ (उमाका वृत्तसेवा) - शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शासन काम करीत आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथील महापशुधन प्रदर्शन समारोप कार्यक्रमात दिली. श्री.साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डीत 'थीम पार्क' उभे करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही‌. नगरविकास विभागाच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. अशा शब्दांत ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिर्डीकरांना आश्वस्त केले.



राज्यशासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या वतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चा समारोप व बक्षिस वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार सर्वश्री जयकुमार गोरे, बबनराव पाचपुते, राहूल कूल, मोनिका राजळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन‌ शिवाजीराव कर्डीले, 'महानंदा' चे चेअरमन राजेश परजणे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश प्रसाद गुप्ता आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, ' पशुधन हिताय, बहुजन सुखात ब्रीद' जपत शेतकरी, पशुपालकांसाठी काम करणारे हे शासन आहे. 'लम्पी" नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला.सप्टेंबर २०२३ पर्यंत 'लम्पी' लस निर्मिती करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे. सरकारने सादर केलेल्या पंचामृत अर्थसंकल्पात शाश्वत शेतीला प्राधान्य देण्यात आले आहे. 'पशुधन' हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. पशुधन वाढले पाहिजे, जोपासले पाहिजे, यासाठी नवनवीन प्रजातींची माहिती प्राप्त करून घेण्याची गरज आहे. 'महापशुधन एक्स्पो' च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शास्त्रीय पध्दतीने शेती व पशुपालन करण्याचे ज्ञान मिळत असते. त्यामुळे 'महापशुधन एक्स्पो' शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. असे ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले , शेतकरी सन्मान योजनेत केंद्र व राज्य शासन मिळून १२ हजार रूपयांची व दुष्काळी जिल्ह्यात २१ हजार रूपयांची वार्षिक मदत दिली जाणार आहे. शेळी-मेंढी विकास महामंडळासाठी बिनभांडवली कर्जासाठी शासनाने १० हजार कोटींची तरतूद केली आहे. महिलांसाठी एस.टी बसमध्ये ५० टक्के तिकिट सवलत, मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवत आहे. सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन विकास साधणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे.


केंद्राच्या सहकार्यामुळे विकासाला वेग -

महाराष्ट्रातील साखर उद्योग अडचणीत असताना केंद्र सरकारने एका बैठकीतच १० हजार कोटींचा आयकर माफ करण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या पायाभूत सुविधा, शहर विकासासाठी केंद्र सरकार राज्याला हजारो कोटी रूपये देत आहे‌. रेल्वे, रस्त्याच्या प्रलंबित प्रकल्पासाठी केंद्राने साडेतेरा हजार कोटी रूपये दिले असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी सांगितले.



दूध भेसळ न करण्याचे उत्पादकांना पशुसंवर्धनमंत्र्यांचे आवाहन -

पशुसंवर्धनमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, तीन दिवसीय महापशुधन प्रदर्शनात आतापर्यंत ८ लाख लोकांनी भेट दिली आहे. राज्य सरकार दूध उत्पादकांना सर्वाधिक दर देत आहे. मात्र दूध भेसळ करू नका असे. आवाहन करत पशुसंवर्धनमंत्री म्हणाले, लम्पी आजारावर मोफत लस देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. निळवंडे प्रकल्पास ५५० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला. वाळू माफियांच्या बंदोबस्त करत सर्वसामान्यांना ६०० रूपये ब्रासने घरापर्यंत वाळू उपलब्ध करून देणारे हे सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आहे.

ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले की, अहमदनगर जिल्हा सहकार , शिक्षण , कारखानदारी , बॅकिंग या क्षेत्रात अग्रेसर आहे. निसर्ग चक्र बदले असून अवकाळी, गारपीटने शेती पिकांचे अतोनात नुकसान होते. अशावेळेस शेतीला पूरक असा जोडधंदा करणे गरजेचे आहे.


शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी ही आपले मनोगत व्यक्त यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पशुधन स्पर्धत प्रथम पुरस्कार प्राप्त काही पशुपालकांना शाल, श्री‌फळ, सन्मानचिन्ह व बक्षिस रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.


महाराष्ट्रातील धाराशिव या आकांक्षित जिल्ह्यामध्ये पशुवैद्यकीय सेवांच्या बळकटीकरणासाठी (A - HELP अंतर्गत ) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पशुसंवर्धन विभाग व भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड यांच्यातील सामंजस्य करार यावेळी करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा नियोजन निधी अंतर्गत 'ई-ऑफीस' प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

प्रास्ताविक खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले. आभार पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी मानले.


000000

शनिवार, २५ मार्च, २०२३

‘महापशुधन एक्स्पो’त १२ कोटींचा रेडा, पाच लाखांची बोली लागलेला खिलारी बैल, सर्वात बुटकी आंध्राची ‘पुंगनुर’ गाय, सातपुडा कोंबडी यांचे आकर्षण !

 

‘महापशुधन एक्स्पो’ ला दुसऱ्या दिवशी नागरिकांचा व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

                                        पशुधनाच्या देशी जाती ठरताहेत आकर्षण

 १२ कोटींचा रेडा, पाच लाखांची बोली लागलेला खिलारी बैल,
सर्वात बुटकी आंध्राची ‘पुंगनुर’ गाय
, सातपुडा कोंबडी यांचे आकर्षण


शिर्डी, २५ मार्च (उमाका वृत्तसेवा) :- साईनगरी शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील 'महापशुधन एक्स्पो २०२३' ला दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देशभरातील गायी, म्हशी, अश्व, शेळी, मेंढी, कुक्कुटपक्षी यांच्या अनेकविविध जाती शेतीला पूरक पर्यायाचा शोध घेणाऱ्या शेतकरी व पशुपालकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. अत्यंत चिकित्सकपणे शेतकरी माहिती जाणून घेताना दिसले. शालेय विद्यार्थ्यांनी ही शिस्तबध्दपणे पशुधनाची माहिती जाणून घेतली.


रविवार (ता. २६ मार्च) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीपासून प्रदर्शनात सहभागी पशू-पक्षी धनांपैकी उत्तम दर्जाची पशूंची गटवाईज निवड करण्याची प्रक्रिया सुरू होती. उत्तम दर्जाच्या पशूंचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.









१२ कोटींचा हरियाणाचा ‘दाराइंद्र’ रेडा, ५१ लाखांचा घोडा, ५ लाख बोली लागलेला देशी खिलार बैल , ६ लाख किंमतीचा राहूरीचा आफ्रिकन फुलब्लड बोकडा, भारतातील सर्वात बुटकी ‘पुंगनुर’ गाय, हुशार मेंढ्या आणि तरतरीत घोडे लक्ष वेधून घेत आहेत. गायीच्या १७ जाती सहभागी झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने देवणी, खिलार, लालकंधार, डांगी, गवळाऊ, जर्शी, एचएफ, कोकण कपिला, गीर, साहिवाल, राठी, काँक्रीज, हरियानवी, केरळची ठेंगणी वेंचूर, पुंगानूर, ओंगल, हळीकट आदी जातींचा समावेश आहे. २० ते २२ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या साहिवाल, गीर गायी सर्वांच्या आकर्षण ठरल्या आहेत. देशात प्राधान्याने गणल्या जाणाऱ्या म्हशीच्या आठ जाती प्रदर्शनात सहभागी आहेत. त्यामध्ये मुन्हा, जाफराबादी, पंढरपुरी, म्हैसाळ, नागपुरी, मराठवाडी, पुरनाथडी, नीलिरावी आदींचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. २९ लिटरपर्यंत प्रतिदिन दूध देणाऱ्या म्हशींची जात प्रदर्शनाचे आकर्षणच आहे.








प्रदर्शनात ३२ जातींचे कुक्कुटपक्षी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये वनराज, गिरिराज, कडकनाथ, न्यू हॅम्पशायर, कावेरी, गॅगस, रेड कॉर्निश, वनराज, असील, जापनीज क्वेल, आरआरआय. सातपुडा, ब्लॅक अट्रालाप, ब्रह्मा, देशी बिव्ही ३८०, ३००, जापनिज क्वेल (बटेर) आदी कुक्कुट पक्ष्याचा समावेश आहे. शेळ्या-मेंढ्याही वेधताहेत लक्ष एका वेळी एकापेक्षा जास्त करडे देण्याची क्षमता, दुधाचे ब्रीड म्हणून ओळख असलेली जमनापरी शेळी, मांस आणि काटक असलेली उस्मानाबादी, संगमनेरी, शिरोही, बेरारी, कोकण कन्याळ, बिटल, बार्बेरी, आफ्रिकन बोर, आफ्रिकन बोअर अधिक उस्मानाबादी क्रॉस, बेल्टम, तोतापुरी, सोजत, कोटा, गावठी शेळ्यांचे अस्सल वाण प्रदर्शनात आहे. अश्वाच्या विविध अस्सल जाती ही प्रदर्शनात नागरिकांची गर्दी खेचत आहेत.








पशुसंवर्धन व कृषी विभागाचे स्टॉल ही लक्ष वेधून घेत आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्याचे पशुधन वैशिष्टये सांगणाऱ्या स्टॉलवरील माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. जनावरांचा चारा कुट्टी करणारे साईलेज बेलर हे मशीन पाहण्यासाठी ही गर्दी होत आहे. मृत जनावरांच्या मूळ त्वचेसह त्यांची अस्सल उभेउभे प्रतिकृती साकारणारे टॅक्सीडॅमी तंत्रज्ञानाची माहिती कोंबड्या एका प्रतिकृतीसह या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. लम्पीवरील लसीनिर्मितीची माहिती देणाऱ्या औंधच्या पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेच्या स्टॉलवर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, पशुवैद्यकीय जाणकारांची गर्दी होत आहे. 'डॉग शो' ही नागरिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला.
या तीन दिवसीय महापशुधन प्रदर्शनाचा उद्या, २६ मार्च रोजी शेवटचा दिवस आहे. या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घ्यावा. असे पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

*****

‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे उद्घाटन

 

दीड कोटी पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्यसरकार संवेदनशील

शिर्डी, दि.२४ मार्च, २०२३ (माका वृत्तसेवा) -   शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्यसरकार संवेदनशील आहे. पशुधनाच्या लम्पी आजारांवरील मोफत लसीकरणासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे राज्यात दीड कोटी पशुधनाचे कमी कालावधीत विक्रमी मोफत लसीकरण व उपचार करण्यात आले. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना ९४ कोटींची मदत करण्यात आली. शंभर टक्के लसीकरण व सर्वाधिक मदत देणाऱ्या राज्यात महाराष्ट्र राज्य देशातील एकमेव राज्य असल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.



राज्यशासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्यावतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री अब्दुल सत्तार होते.



पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, शेतीला पुरक असा जोडधंदा म्हणून पशुधन व्यवसायाकडे पाहिले जाते. दूग्ध व कुक्कुटपालन व्यवसायाला नवीन दिशा मिळावी, नव-नवीन तंत्रज्ञानाचा पशुधन व्यवसायाला फायदा झाला पाहिजे. यासाठी ‘महापशुधन एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. शेळी-मेढी पालनाला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या महामंडळाचे राज्याचे मुख्यालय अहमदनगर असणार आहे. यासाठी वार्षिक दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे‌. हा व्यवसाय करणाऱ्या तरूणांना १ लाख ७५ हजार रूपयांचे बिन व्याजी कर्ज दिले जाणार आहे‌.



पशुधनाच्या लसीच्या निर्मितीत स्वयंपूर्ण होण्यासाठी पुण्यात  ७० कोटी रूपये खर्चून प्रयोगशाळा उभारण्यात आली असून सप्टेंबर २०२३ पासून प्रत्यक्ष लसीच्या उत्पादनाला सुरूवात होणार आहे. यामुळे महाराष्ट्र देशाला लस पुरविणार आहे. कृत्रीम कार्यक्रमात बदल करून ९५ टक्के मादी पशुधन निर्माण होतील यासाठी प्रयत्न आहेत. गायींच्या जतन, संवर्धनासाठी गो-सेवा आयोग विधेयक मांडण्यात आले आहे. असे पशुसंवर्धन मंत्री श्री. विखे-पाटील पाटील यांनी सांगितले.



अहमदनगर जिल्ह्यापुढे सर्वात मोठे आवाहन दूध भेसळीचे आहे. असे स्पष्ट करत श्री. विखे-पाटील म्हणाले, नवीन कायदा आणून दूध भेसळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल. तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात येईल. यावर सर्वसामान्य नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात. असे आवाहन ही पशुसंवर्धनमंत्र्यांनी केले. सावळीविहिर येथील शेती महामंडळाच्या जागेवर नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय बांधण्यात येईल. अशी घोषणा ही‌ श्री. विखे-पाटील यांनी यावेळी केली.

जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई महिनाभरात देणार –कृषीमंत्री अब्दुल सत्तार

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात महिनाभराच्या आत नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल. अशी ग्वाही कृषीमंत्री‌ अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.

महापशुधन एक्स्पो मध्ये ३०० स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. विविध प्रजातीचे पशुधन या ‘महापशुधन एक्सपोमध्ये सहभागी झाले आहे.  प्रदर्शनाचे नियोजन उल्लेखनीय आहे. केवळ १ रुपयांमध्ये शेतकऱ्यांना विमा देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी  योजनेद्वारे केंद्र व राज्यशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपयांचा वैयक्तिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.




खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ च्या आयोजना मागील भूमिका विशद केली.

पशुसंवर्धन विभागाचे राज्याचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी आपल्या मनोगतात जनावरांच्या ‘लम्पी’ आजाराविषयी शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, 'महानंदा'चे चेअरमन राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई विखे - पाटील, पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, अरुण मुंढे,  कृषी विभागाचे आयुक्त सुशिलकुमार चव्हाण, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, अहमदनगर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते. 




यावेळी ‘पशुसंवर्धन दैनंदिनी’, ‘योजनांच्या घडी पुस्तिका’ व ‘सुलभ शेळीपालन’ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त शितलकुमार मुकणे यांनी केले. अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनिल तुंबारे‌ यांनी आभार व्यक्त केले.

२५ व २६ मार्च २०२३ रोजी ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुला असून याचा लाभ घ्यावा. असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

000000

 

एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया !

एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया ! संत गाडगेबाबांच्या शिकवणीचा अंगीकार हातात खराटे, फावडी, घमेली घेत एक अवलिया गावांमध्ये अवतर...