सोमवार, १९ जून, २०२३

एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया !

एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया !

संत गाडगेबाबांच्या शिकवणीचा अंगीकार



हातात खराटे, फावडी, घमेली घेत एक अवलिया गावांमध्ये अवतरतो आणि गावाची उत्स्फूर्तपणे स्वच्छता करू लागतो. ऐरवी गावाला परिचीत नसलेल्या या अवलियाचे लोकांना अप्रुप वाटते. लोकही त्यांच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी होतात. काही तासात गावातील काना-कोपरा चकाचक झालेला असतो. ही किमया करणारा अवलिया आहे हरिभाऊ ज्ञानोबा उगले. 



अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेल्या हरिभाऊ ज्ञानोबा उगले यांनी संत गाडगेबाबांना आदर्श मानत ग्रामस्वच्छेतेचा वसा घेतला असून त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील एक हजार खेड्यांना भेटी देत तेथे स्वच्छता केली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील अनेक खेड्यांमध्ये एक रात्र मुक्काम करून त्यांनी ग्रामस्वच्छता करून घेतली आहे‌‌. ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले आहे. जनजागृती केली आहे.  हरिभाऊ उगले यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या कुटुंबीयांचे त्यांना नैतिक पाठबळ लाभले आहे. डोंगरगाव शिवारात हरिभाऊंची सहा एकर बागायती शेती आहे. दूधाचा जोडधंदा आहे. त्यांचा गुरांचा गोठा अतिशय स्वच्छ असतो. आदर्श गोठा म्हणून पंचक्रोशीतील नागरिक गोठा पहाण्यास आवर्जून भेट देत असतात. 



दूचाकी मोटारसायकलने ते महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात, वाड्या-वस्त्यांवर जातात. तेथे ग्रामपंचायत, मंदीर, शेतात किंवा मिळेल त्या मोकळ्या जागेत मुक्काम करतात. गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेल्या भोजनाचा आस्वाद घेत ते ग्रामस्वच्छेतेचे काम अविरतपणे करत आहेत. हरिभाऊ या नावाने ते परिचित झाले आहेत. हरिभाऊंच्या स्वच्छतेचा पुरावा काय म्हणता येईल तर हजारोच्या वर ग्रामपंचायतीनी त्यांना दिलेले प्रशस्तीपत्रक आहे. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामधील छायाचित्र ही त्यांच्या मोबाईलमध्ये संग्रहित आहेत. ‘ग्रामस्वच्छतेचा मूलमंत्र, आरोग्य आणि समृध्दी एकत्र’, ‘आपली स्वच्छता आपल्या हाती, मिळेल आजारातून मुक्ती’ अशा विविध प्रेरक घोषवाक्यांच्या पाट्या तयार करून ते जनजागृती करतात.



ग्रामस्वच्छतेबरोबर गावा-गावांमध्ये सुरू असलेल्या किर्तन सप्ताह, विवाह सोहळ्यात पंगतीत गळ्यात पाटी अडकवून अन्न वाया न जाऊ देण्याचा संदेश हरिभाऊ देतात.  ‘जेवढे बसेल पोटात, तेवढेच घ्या ताटात’, ‘महिने लागतात पिकवायला आणि मिनीट लागतो फेकायला’ अशा घोषवाक्याच्या पाट्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात.  

हरिभाऊंना नदी स्वच्छतेविषयी ही तळमळ आहे. डोंगरगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत एक कांतिक्रारी ठराव केला आहे. गावात मृत्यूमुखी पडणाऱ्या‌ व्यक्तींचा अंत्यविधी शेतात करणाऱ्या कुटूंबाची वर्षभराची घरपट्टी हरीभाऊ स्वतः भरणार आहेत. हरिभाऊंच्या मनात अंधश्रध्देला थारा नाही.ओसाड, उजाड पडलेल्या स्मशानभूमींची हरिभाऊ स्वच्छता करतात.  

बोलता-बोलता हरिभाऊ सामाजिक वास्तवावर मार्मिक भाष्य करतात. ते म्हणतात, "खेड्या-पाड्यातील तरूणाई व्यसनांच्या विळख्यात अडकून गेली आहे. मुलींचे घरून पळून जाण्याचं प्रमाण वाढले आहे. आज गावा-गावात ३० ते ३५‌ वय वर्ष ओलांडलेले असंख्य तरूणांचे विवाह झालेले नाहीत. पूर्वीही गावांमध्ये उत्सव, सप्ताह, जत्रा गुण्यागोविंदाने, आनंदाने आयोजित केले जात होते. आज मात्र याला बीभत्स, धांगडधिंग्याचे स्वरूप आले आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चार ते पाच गोण्या भरतील एवढ्या दारूच्या बाटल्यांचा कचरा निघतो.‌आजच्या समाजाला संत व महापुरुषांच्या विचारांची शिकवण नव्यानं देण्याची गरज निर्माण झाली आहे.''

हरिभाऊ संपर्क क्रमांक - ९८८१२१८७०६

लेखन - सुरेश पाटील, शिर्डी

बुधवार, १७ मे, २०२३

श्री साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे




मुंबई, दि. १७- शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. 



श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे उपस्थित होते. 


संस्थानमधील प्रत्येक कर्मचारी हा सेवाभावी वृत्तीने काम करीत असून त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मकतेने विचार करण्यात येईल. हे सर्वसामान्य, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून या सर्व घटकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 


यावेळी खासदार श्री. लोखंडे आणि संस्थानच्या वतीने श्री साईबाबांची मूर्ती, शाल देऊन मुख्यमंत्र्यांचा आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 
०००००

सोमवार, १५ मे, २०२३

‘शासन आपल्या दारी’ - बळीराजाच्या उन्नतीसाठी योजना

 

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम सन २०१६ पासून राबविण्यात येत आहे.

योजनेची उद्दीष्टये :-

-  नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.

- शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.

-  पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.

-   कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठयात सातत्य राखणे.

योजनेचे वैशिष्टये :-

-    कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

- खातेदारांचे व्यतिरिक्त कुळांसाठी सुध्दा ही योजना खुली ठेवण्यात आलेलो आहे.

- विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजूर कर्ज मर्यादे इतकी राहील.

-   शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम २ टक्के व रब्बी हंगाम १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

-   या योजनेतंर्गत ७० टक्के जोखिमस्तर देय राहील.

-  अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पन्न म्हणजे मागील ७ वर्षाचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली २ वर्ष वगळून) गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल.

जोखमीच्या बाबी - योजनेअंतर्गत जोखमीची व्याप्ती वाढविण्यात आली असून त्यामध्ये खालील बाबीचा समावेश करण्यात आला आहे.

-   पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे पिकांच उत्पन्नात येणारी घट

-  हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.

- पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान.

-  काढणी पश्चात नुकसान

-  स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान.

नुकसान झाल्यास काय करावे :-  स्थानिक आपत्ती व काढणीपश्चात या जोखीम अंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतलेल्या सर्व्हे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक अथवा क्रॉप इन्शुरन्स पत्त्यावर कळवणे आवश्यक राहील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून आवश्यक बंधनकारक दस्तावेज : - सन २०१७-१८ पासून पिक विमा हप्ता भरण्यासाठी आधारकार्ड क्रमांक आवश्यक आहे. सातबारा उतारा, बँक खात्याचा तपशील आणि बँक पासबुकची प्रत, रद्द केलेला धनादेश, राज्य सरकार विहित पेरणी प्रमाणपत्र किंवा प्रस्तावित पिकाची पेरणी करण्याचा उद्दिष्टाचे स्वतःचे घोषणापत्र, योग्य भरलेले प्रस्ताव पत्र, अधिक माहितीसाठी जवळच्या बँक शाखा, कृषी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.

                                      संकलन – उप माहिती कार्यालय, शिर्डी.

एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया !

एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया ! संत गाडगेबाबांच्या शिकवणीचा अंगीकार हातात खराटे, फावडी, घमेली घेत एक अवलिया गावांमध्ये अवतर...